भाजी आवडीची नाही म्हणून माझी रोज चिडचिड व्हायची,
तेल-चटणी खाऊन मग माझी भूक शमायची.
आई शास्त्राची शिक्षिका असल्याने वेगवेगळ्या पालेभाज्या करायची,
कधी मेथी, कधी शेपू, कधी कारलं तर बऱ्याचदा गवारी-भेंडी-दोडके असायची.
त्याच त्याच भाज्या आणि त्याच त्याच चवीची सल मला व्हायची,
कधीतरी भरीत, कधीतरी पिठलं, कधीतरी सांडगे जेवणाला असावेत अशी इच्छा माझी असायची.
भाजी आवडीची नाही म्हणून माझी रोज चिडचिड व्हायची,
दही-चटणी खाऊन मग माझी भूक शमायची.
भाज्यांनी शरीराला जीवनसत्व मिळतं, शरीर निरोगी राहतं हे लेक्चर आई मला रोज द्यायची,
कोणत्या भाज्यांमध्ये 'अ', 'ब' आणि कोणत्यामध्ये 'क', 'ड' हे पाठांतर त्या निमित्ताने माझ्याकडून करून घ्यायची.
जेवताना कुरकुर करू नये, अन्नाला नावे ठेऊ नये हि आजोबांची शिकवण क्षणोक्षणी मला असायची,
आणि आईवर चिडचिड केली कि 'आईला उलट बोलू नये, अन्नावर राग काढू नये' अशी वडिलांचीही भर त्यात असायची.
भाजी आवडीची नाही म्हणून माझी रोज चिडचिड व्हायची,
डाळ-तेल-तिखट खाऊन मग माझी भूक शमायची.
बाजरीची भाकरी रोजच आईने करावी आणि त्यासोबत घेवड्याची - वाटाण्याची उसळही असावी हि इच्छा माझी असायची,
पण वाटाण्याचा सिझन आणि बाजरी चे दिवस कधीही नसतात याची जाणीव मला आई करून देत राहायची.
रागारागाने मग दुपारचा डबा मुद्दाम घरी विसरण्याची चूक माझ्या हातून घडायची,
पण आईने मागून येताना माझा डबा आणलेला असायचा, त्यामुळे दुपारची जेवणाची सुट्टी घरचं जेवण जेऊनच व्हायची.
भाजी आवडीची नाही म्हणून माझी रोज चिडचिड व्हायची,
ठेचा-भाकरी खाऊन मग माझी भूक शमायची.
शाळेत असतानाच्या ह्या आवडी-निवडी, जिभेचे चोचले मी जरा जास्तच जोपासले,
दहावी-पर्यंत घरी होतो, आई-वडिलांच्या मायेत होतो, त्यामुळे आईने ते निभाऊन नेले.
पुढे उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी राहावे लागले,
अन खानावळीतलं जेवण जेवताना मग घरच्या जेवणाचे महत्व उमगले.
कधी भोपळा, कधी कोबी तर नेहमीच बटाटे पोटात रिचवले,
कधी सोंडी-किडे बाजूला वेचून भात, कधी चिवट चपात्या, तर कधी डाळीच्या पीठाचे वरणही पचवले.
आईच्या हातच्या जेवणाची बरोबरी जगात कोणत्याच पदार्थात नाही हे तेव्हाच मला कळले,
आणि तो गोडवा, ती चव अन ती माया आज खूपच दुर्मिळ झाल्याचे मी जाणले.
घशातून, मिळेल त्या जेवणाचा घास उतरवताना मग आईचे शब्द आठवले,
भाज्यांमधल्या 'जीवन-सत्वा' मधून मला जीवनाचे सत्व कळाले.
कधी शिक्षणासाठी बाहेरगावी तर कधी नोकरीनिमित्त परगावी राहावं लागलं,
कधी खानावळ, कधी हॉटेल तर कधी नाश्त्यावरही पोट रिकामं ठेवावं लागलं.
कधी मधी उपवास, मग केळी-वेफर्स-राजगिरा आणि नारळ-पाण्यावरही राहावं लागलं,
कधी मग वडा-पाव, कधी सामोसा तर कधी रिकाम्या पोटीही झोपी जावं लागलं.
हे घरी आईला फोनवर सांगताना माझी होणारी कोंडी आई नेहमीच ओळखायची,
पोटाचे हाल करू नको बाळा, आवडेल ते खा-पी म्हणून आई मला धीर द्यायची.
घरी गेल्यावर मग माझ्या आवडीचे आणि हवे ते करून आई मला जेऊ घालायची,
कधी मग भरलेलं वांगं, कधी ठेचा-भाकरी तर कधी वाटाण्याची उसळही मग करायची.
.......... भाजी आवडीची नाही म्हणून माझी रोज चिडचिड व्हायची,
चटणी-भाकरी खाऊन मग माझी भूक शमायची.
कविता लिहिलेली,
तारीख: २२/११/२०११
स्थळ: SAINT-GOBAIN, अंधेरी(पूर्व), मुंबई.
